Saturday, June 13, 2026
●फडे मधुर खावया●
(लेखांक ३३)
●फडे मधुर खावया●
मराठीसारखी मनमिळावू, सर्वधर्मसमभावाची व सोशिक भाषा या जगात दुसरी सापडणे अशक्य आहे. तिच्या सर्वसमावेशकतेमुळे किती तरी परप्रांतीय घुसखोर आपलेच घर समजून मराठीत ठिय्या देऊन बसले व स्वरात स्वर मिसळून गायला लागले आहेत. त्यामुळे मराठीनेसुध्दा 'मिले सुर मेरा तुम्हारा' असे म्हणत त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेऊन 'सुर की महिमा' साऱ्या जगाला दाखवून दिली आहे.
प्रत्येक भाषेचा आपला एक डौल असतो, अदा असते, तरी पण त्या त्या भाषेतील शब्दांचा अपभ्रंश करून बोलणारे सगळी लय बिघडून टाकतात. डौल बिघडवतात. आपल्या मराठी मायबोलीत आलेले इतर भाषांमधील शब्द बिचारे एकजीव होऊन बसले, पण इंग्रजी मात्र अजूनही आपले वेगळेपण जपून आहे. त्यामुळे मराठी बोलतांनासुध्दा एखादा तरी इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय आम्हाला करमतच नाही. कमीत कमी 'इंप्रेशन' पाडायला तरी एखादा इंग्रजी शब्द वापरायचाच हा आमचा मराठी बाणा ! त्यामुळे ओ. सी. (ऑफिस कॉपी) चे ओशी, फाईलचे फायली, 'कम्प्लेंट'चे कंम्प्लेटा असे अनेकवचन व टेम्पररीचे टेंपरवारी, टाईल्सचे स्टाईल, ट्युबचे टूप, पिक्चरचे पिच्चर असे उच्चार होताना दिसून येतात.
मी कॉलेजमध्ये गेल्यावर पहिल्याच हजेरीच्या वेळी इंग्रजीच्या राव नामक प्राध्यापकाने मिस्टर एस. पी. कॅडॅम असे नामकरण करून मला धर्मांतराच्या टोकावर नेऊन ठेवले. पहिल्या वर्गापासून सुधाकर पांडुरंग कदम असे पूर्ण नाव शुध्द मराठीत ऐकायची सवय असल्यामुळे त्या दिवशीच्या नामांतर सोहळ्यामुळे आम्ही बेशुध्द व्हायच्या बेताला आलो व आमची पितरे झिंगल्यासारखी होऊन भेलकांडायाला लागली. हे काही बरे नव्हे म्हणून व वर्गातील मुलीही या नावाला फिदीफिदी हसल्या म्हणून मी उभे राहून 'कॅडॅम' नव्हे 'कदम' असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण रावांना मराठी समजत नसल्यामुळे त्यांनी 'यऽऽस, यूऽऽऽ, व्हाट हॅपन्ड ? सिट डाऊन प्लिज ! आऽऽऽय से सिट डाऽऽऊन' केले. पण आमच्या टाळक्यात काहीच न शिरल्याने आम्ही उभेच. हे पाहून पुन्हा 'हेऽऽऽ यूऽऽऽ, गेटआऊट' असले काही तरी इंग्रजीत सांगितले. त्यातील 'गेटआऊट' तेवढे आम्हाला समजले. पहिल्याच दिवशी घोर अपमान होत असलेला बघून आम्हीही तावात आलो व 'यू आर राँग सर, माय नेम इज कदम, अँड यू आर कॉल्ड मी कॅडॅम, देट इज कदम कदऽऽऽम, नॉट कॅडॅम! प्लिज रिपेअर (दुरुस्त करा) माय नेम इन युवर रोल कॉल' अशी मायबोलीतील खडी इंग्रजी सुनावली. पण आमची इंग्रजी रावांना समजेना व रावांचे सांगणे आम्हाला पटेना! वर्षभर असेच चालल्यामुळे आमचे इंग्रजी कच्चे राहिले ते राहिलेच !
आमच्या चिरंजीवांच्या दहावीच्या परीक्षे अगोदर त्याचा शाळेतील निरोप समारंभ आटोपला. त्याच दिवशी आजी अत्यवस्थ असल्याचा निरोप आला. आम्ही सर्व कुटुंबीय शेवटची भेट घ्यायला खेड्यावर पोहचलो. सगळे नातेवाईक जमा झाले होते. आम्ही सर्व जण आजीला भेटून, निरोप घेऊन खोलीच्या बाहेर आलो. तेवढ्यात गावचे पाटील तिथे आले व दरवाज्यात उभ्या असलेल्या आमच्या चिरंजीवांना म्हणाले. 'काय म्हणते रे आजी? चिरंजीव उद्गारले, 'सध्या आजीचा सेंड ऑफचा कार्यक्रम सुरू आहे!'
सातव्या इयत्तेत असताना माझ्या फाळके नावाच्या वर्गबंधूला 'ळ' चा उच्चार करता येत नव्हता.तो 'ळ' ला 'ड' म्हणायचा.मुलं त्याला 'फाड'के म्हणायची.एकदा मराठीच्या तासिकेला शिक्षकांनी एकेक विद्यार्थ्याला एकेक कविता म्हणायला सांगितली.नेमकी फाळकेच्या वेळी 'फळे मधुर खावया असती नित्य मेवे जरी' ही कविता आली. फाळकेने उच्च सुरात सुरू केली 'फडे मधुर खावया....' अर्थात पुढील ओळी विद्यार्थी व शिक्षकाच्या हस्यकल्लोळात बुडून गेल्या हे सांगणे नकोच!
●
दै. विदर्भ मतदार,अमरावती.रविवार दि.१४/६/३०२६
Friday, June 12, 2026
अवखळ मन...
माझ्या रचनेवर सुरावट येणे फार कमी वेळा घडते.
आल्यावर तीचा राग शोधायला जावे तर कोड्यात पडतो.नुकतीच ध्वनिमुद्रित झालेली ही रचना कोणत्या रागात आहे हे आपण रसिकांनीच सांगावे...
अवखळ मन हे ऐकत नाही
होई भरकट पुन्हा पुन्हा ही
किती बंधने घाला त्यावर
तरी होतसे पुन्हा प्रवाही
धरती अंबर जेथे मिळते
त्या क्षितिजाला अंतच नाही
साधे सोपे असूनही पण
गूढ भासते सारे काही
गायक - मयूर महाजन
तबला - अपूर्व द्रविड
सतार - प्रसाद गोंदकर
गिटार - राधिका अंतुरकर
संगीत संयोजक - मिलिंद गुणे
ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ,पुणे.
मिक्सिंग,मास्टरिंग - अजय अत्रे
Thursday, June 11, 2026
राग-रंग...मल्हार
आसवांचे जरी हसे झाले
१९८० मध्ये सुरेश भट आर्णीला माझ्याकडे आले असताना रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर गप्पा सुरु असताना एकदम काय झाले माहीत नाही.एक गझल मला लिहून घ्यायला सांगितली व जरा यमनच्या स्वरात गुणगुणून दाखवता काय? (ही विनंतीवजा आज्ञाच होती) असे विचारले. मतला होता...
आसवांचे जरी हसे झाले
हे तुला पाहिजे तसे झाले
यमन हा दोघांच्याही आवडीचा राग...त्यांनी सहज म्हटले व मी पण सहज गंमत म्हणून हार्मोनियम घेऊन यमनची सुरावट छेडत बसलो. चाल बसवणे हा उद्देश नसताना आणि निव्वळ फावल्या वेळेतील गप्पा सुरू असताना यमन छेडता छेडता सहजच सुचलेली सुरावटीत त्यांना ऐकविली.लगेच "व्वा! क्या बात है कदम साहेब" अशी मजेशीर दाद देऊन ते पलंगावर पहुडले. आम्ही पण झोपण्याची तयारी करायला लागलो.पाच-दहा मिनिटातच 'ती जरा पुन्हा एकदा ऐकवता काय?' अशी विचारणा केली.मी पुनः हार्मोनियम काढली व सुरावट आठविण्याचा प्रयत्न करायला लागलो.कारण गंमत म्हणून सहज गुणगुणलो होतो.बऱ्याच प्रयत्नानंतर थोड्या फार फरकाने आठवली.आणि जशी आठवली तशी भटांना ऐकवली.त्यानंतर ते व आम्ही निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
आज हे आठविण्याचे कारण म्हणजे जीर्ण झालेली जुनी डायरी...मी सध्या मुलीकडे नांदेड सिटीला मुक्कामी आहे.१४ तारखेला सुरेश भटांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छोटीशी मैफल जमवावी म्हणून मयूर, प्राजक्ताला फोन केला.
मयूरकडे सुरेश भटांच्या शिकविलेल्या माझ्या बंदीशींच्या बऱ्याच गझला आहेत.अनेक कार्यक्रमातून त्याने सादर केल्या आहेत.पण प्राजक्ताकडे माझ्या बंदीशीची सुरेश भटांची एकही गझल नव्हती.म्हणून मग वारजे येथील माझ्या निवास स्थानावरून निषादला डायरी पाठवायला सांगितली.तर त्याने सगळ्या डायऱ्या पाठवून दिल्या.माझ्या शेवटच्या (म्हणजे मी कार्यक्रम करीत असतानाच्या वेळची) डायरीतील दोन गझला मोबाईलवर गाऊन तयार करण्यासाठी प्राजक्ताला पाठविल्या.नंतर १९७५ पासूनची जुनी डायरी चाळायला लागलो.त्यात ही गझल दिसली.व जुनी 'आठवण' ताजी झाली.बस्स!इतकेच...
आसवांचे जरी हसे झाले,
हे तुला पाहिजे तसे झाले
चंद्र आला निघूनही गेला
ऐन वेळ असे कसे झाले
शोधुनी मी तुला कुठे शोधू
चेहऱ्यांचेच आरसे झाले
संपले हाय बोलणे माझे
जे तुझ्याशी कसे बसे झाले
●
दैनिक विदर्भ मतदार,अमरावती.रविवार दि.८/६/२०२६
इतना मुझे चाहा करो ना
सुरेशजीने अपने खास अंदाज़ में गायी हुई समीर की यह उर्दू ग़ज़ल मुझे बहुत पसंद है।क्यों की ग़ज़ल, गायन और बंदिश सभी दिल लुभानेवले है।यह ग़ज़ल जनसंमोहिनी राग पर आधारित है।लेकिन इसके शेरों में आनेवाला तीव्र मध्यम मन को मोह लेता है। इसे एकदम गले से उतारना मुश्किल था।लेकिन सुरेशजीने इसे बखुबी उतारकर चार चांद लगा दिए है।
आप भी सूनकर लुत्फ़ उठाईएगा...पसंद आए तो डॉ शब्द लिखीएगा।
आठवण...मित्रवर्य वामन तेलंग यांची
माझ्यातील गायक/संगीतकारावर प्रेम करण्या सोबतच माझ्यातील कवी/लेखकास हेरून प्रोत्साहित करणारे नागपुरच्या तरुण भारत या दैनिकाचे माजी संपादक मित्रवर्य #वामन_तेलंग यांना जाऊन बघता बघता तीन वर्ष झालीत.त्यांच्या जाण्याने वैयक्तिक माझे खूप नुकसान झाले आहे.... ते जर माझ्या आयुष्यात आले नसते तर माझ्यातील कवी/लेखक लोकांना माहितीच झाला नसता...
'#फडे_मधुर_खावया...' हे 'निवडक विषयांतराचे' पुस्तक त्यांच्यामुळेच प्रकाशित झाले.या पुस्तकाला प्रस्तावना पण त्यांचीच आहे...ती खाली देत आहे.
-------------------------------------------------------------------------
. आर्णीच्या मातीचा गंध
-
माझे मित्र सुधाकर कदम यांचे नाव प्रामुख्याने संगीतकार म्हणून आणि विशेषत्वाने मराठी गझल गायक म्हणून सर्वविख्यात आहे़. आर्णी-यवतमाळच्या भागात संगीत शिक्षक म्हणूनही ते अनेकांना परिचित आहेत़. त्यांचे एकूण व्यक्तिमत्व संगीताच्या दुनियेशी मेळ खाणारे आहे़. म्हणजे असे की भरपूर उंची, गोरापान रंग, नीटस नाक-डोळे आणि डोक्यावरील कुरळ केस असे त्यांचे दर्शन आहे़. त्यावरून सहजपणे कुणालाही वाटून जावे की, हा माणूस नक्कीच गायक-कलावंत असणार! फार कमी लोकांना अशी एकरूपता लाभत असते़. आपण पाहतोच ! निसर्गाने ज्यांच्या कंठामध्ये मधाचे पोवळे ठेवले आहे त्यांना रंग आणि रूप देतांना मात्र त्याने फार कंजूषपणा केलेला आहे़. अर्थात यालाही-अपवाद असतोच़. विशेषतः जे गझल गायक-कलावंत असतात ते तर निश्चितच याला अपवाद दिसून येतील़. सर्वच कसे देखणे, रुबाबदार! सुधाकर कदम हेही त्याच मालिकेतले़. आर्णीसारख्या आडगावात राहूनही त्यांनी गायकीचा रंग-ढंग जोपासला आणि आर्णीच्या मातीचा गंध महाराष्ट्रात नेला़. संगीताच्या प्रसारासाठी संगीताची शाळा काढली़. स्वतःच्या पदराला खार लावून घेत कार्यक्रम केले़. आपले आणि आपल्या वाद्यवृंदाचे वेगळेपण ठसविण्यासाठी गझल या प्रकारातील गीतांची निवड केली़. ती करतानाही त्यांनी अनवट अशी वाट निवडली़. ‘मराठी गझल’ हा प्रकार कार्यक्रमासाठी पसंत केला़. हिंदी-उर्दू गझल गाणे वेगळे आणि मराठी गझल पेश करणे वेगळे़. हिंदी, उर्दू-हिंदूस्थानी, मराठी या केवळ भाषा नाहीत़. भाषेबरोबरच त्या त्या भाषांची संस्कृतीही प्रवाहित होत असते़. संस्कृतीनुसार भाषांचा बाज बदलत असतो आणि भाषा-वैशिष्ट्यामुळे संस्कृतीचा मळा श्रीमंत होत असतो. गझल च्या संदर्भात ते अधिकच खरे आहे़. कारण तो ढंग काही मराठीचा नव्हे़. अरबी-उर्दू ही त्या प्रकारातील काव्याची गर्भगत नाऴ. अव्वल इंग्रजीच्या काळात केव्हा तरी मराठीने गझलचे वृत्त-लेखन स्वीकारले़. त्या सर्व तपशिलामध्ये जाण्याचे येथे कारण नाही़. सांगायचा मुद्दा असा की जो प्रकार आपल्या भाषिक कुळातला नाही तो प्रकार घेऊन सुधाकर कदमने आपले कार्यक्रम यशस्वी केले़. ही वाट वहिवाट नव्हती़. हिंदी-उर्दू गझल अशीच वहिवाट होती़. सुधाकरने ती सोडली आणि मराठी गझल लोकप्रिय करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला़. कित्येक वर्ष तो या खटाटोपीच्या मागे होता़. पुढे त्याने स्वर-लेखन केले़. त्याचा अर्थ असा की तेथे स्वर हा घटक प्रधान होता़. ‘लेखन’ ही दुय्यम बाब होती़. त्याच्या कार्यक्रमातही ‘गझल’ हा प्रकार प्रधान होता; ‘मराठी’ हा त्याचा पेहराव होता़. कित्येक वर्ष तो या केंद्राभोवती घुटमळत रमला़. अगदी परवा परवा पर्यंत त्यात अंतराय असे आले नव्हते़. मराठीतील कवी आणि त्यांच्या रचना यांचेशी त्याची सलगी होती खरी, पण त्यामागचा हेतू ‘गझल रचना मिळणे’ हा होता़. कदाचित् त्या जोशाजोशात त्याने कविता-लेखनही करून पाहिले असेल, पण तेही पुन्हा गाण्यासाठीच होते़. असे असताना, माझ्या समजुती प्रमाणे, तो अचानक स्फुट लेखनाकडे वळला़. योगायोगाने त्याच वेळी नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकामधून त्याच्या संपादकीय पृष्ठावर ‘विषयांतर’ हा स्तंभ येत होता आणि त्यातील हलक्या-फुलक्या लिखाणामुळे तो स्तंभ वाचकांच्या व लेखनाची सुरसुरी असणार्यांच्या आवडीचा स्तंभ झाला होता़. सुधाकरने अलगद त्या स्तंभावर झेप घेतली आणि गायनीकळा लाभलेला सुधाकर कदम लेखन-कलेने बाधित झाला!
सुधाकर कदम यांच्या गायक असण्याचा, तो शिक्षक असण्याचा, वाद्यवृंद संघटक असण्याचा वर मी थोड्या अधिक तपशिलाने उल्लेख केला आहे़. त्याला तसेच कारण आहे़. आयुष्याची मोलाची बरीच वर्षे या क्षेत्रामध्ये झिजतांना माणसांचे जे चित्रविचित्र नमुने आणि अनुभव त्याच्या गाठी जमा झाले होते; त्या अनुभवांना त्याच्या ‘विषयांतर’ मधील स्फुट-लिखाणाने एक चांगला पाट मिळाला आहे़. संगीताची जाण ठेवणार्यांना आणि विशेषतः गीत-गायकांना कवितेची-काव्याची व बर्या-वाईट साहित्याची ओळख असायलाच हवी असते़. सुधाकरच्या ठिकाणी ती ओळख पिण्डतःच होती़. त्याच्या या पुस्तकात संग्रहित झालेल्या स्फुट-लेखांवरुन वाचकांना त्याची सहजच कल्पना येईल़. उदाहरणावरून यातील शीर्षकाचा स्फुटलेख पहा़. त्याची सुरवातच श्री़. म़. माटे आणि त्यांच्या ‘भाषाभिवृद्धीची सामाजिक दृष्टी’ या पाठाच्या उल्लेखाने होते़. जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर ‘माटे मास्तरांचा हा धडा’ अनेकांनी अभ्यासिला असेल़.परंतु नेमक्या ठिकाणी त्याचा संदर्भ देण्याचे कसब त्यातल्या फारच थोड्यांना साधले असेल़. मुळात साहित्य व त्याची आवड असेल तरच पाठ्यक्रमातून जाणारे असे संदर्भ संबंधिताला आठवतील, ही बाब येथे लक्षात घेण्यासारखी आहे़. स्फुटासाठी सुधाकरच्या कामी हा संदर्भ जसा हुकुमासारखा येतो त्याचप्रमाणे गायकी कलेतील प्रत्यक्षातला अनुभवही कामाला येतो़. हे अनुभव इतर सामान्य अनुभवापेक्षा वेगळे असतात, आणि लेखकाच्या हातोटीमुळे ते पैलूदार बनतात़. त्याचाही प्रत्यय या संग्रहात वाचकांना ठिकठिकाणी आल्याखेरीज राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो़.
सुधाकर कदमचे हे लिखाण अर्थातच स्फुट स्वरूपाचे आणि विरंगुळ्यासाठी केलेले लिखाण आहे़. अशा लिखाणाची खुमारी त्याच्या मांडणीत, आणि लेखकाचे ठायी असणार्या निरीक्षणाच्या ताकदीत सामावलेली असते़. तसे त्यातले अनुभव, त्यातले प्रसंग, प्रसंगविशेषी दिसून येणार्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव, त्यांचे वर्तन, त्यांचा व्यवहार आपल्या नित्याच्या अवलोकनाचाही असतो़. परंतु त्याकडे आपले लक्ष जातेच असे नाही़. लेखक आणि वाचक यांच्यात हीच एक रेषा असते़. वाचक जेव्हा ही रेषा ओलांडतो तेव्हा तोही लेखक होऊ शकतो़. ज्यांना ती रेषा पार करता येत नाही त्यांना या प्रकारच्या लेखनामुळे एकप्रकारचा विविध पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो़.
सुधाकर कदमच्या या पुस्तकातून त्याच्या वाचकांना असा आनंद मिळेलच याविषयी मला मुळीही शंका नाही़. अशी शंका नसणे हे लेखक म्हणून सुधाकरचे यशच मानले पाहिजे़.
-वामन तेलंग,
संपादक,दैनिक तरुण भारत.
नागपूर : कार्तिक एकादशी / १९९८)










